पनवेल : खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी शुक्रवारी पनवेलमध्ये आले होते. तटकरे यांच्या पनवेल दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या सेना, काँग्रेस नेत्यांचीदेखील बैठक पार पडणार होती. मात्र, या बैठकीकडे सेना, काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरविली.
सेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या राष्ट्रवादीवरील टीकेमुळे रायगडमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे पाहावयास मिळाले होते. जिल्ह्यातील सेना आमदारांनीदेखील यावेळी तटकरेंवर टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनीदेखील तटकरेंवर टीका केली होती. यानंतर तटकरे पनवेलमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत प्रथमच बैठक घेणार होते. मात्र, वेगवगेळी कारणे पुढे करून काँग्रेस, सेना नेत्यांनी या बैठकीस येण्याचे टाळल्याचे समजते.
खासदार तटकरेंसारखे ज्येष्ठ नेते पनवेलमध्ये आल्यावर काँग्रेस, सेना, तसेच शेकापचे नेतेदेखील तटकरेंना भेटण्यासाठी आले नसल्याने पुढील वर्षी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते एकत्र येतील का, याबाबतदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत तटकरेंना विचारणा केली असता, महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत आहे. मात्र, अचानक ठरलेल्या बैठकीला वेळेअभावी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उपस्थित राहता आले नसल्याचे तटकरे यांनी संगितले.