दिल्लीत अजित पवार वेटिंगवर? सुनील तटकरे म्हणाले, "आम्हाला माहिती होतं की अमित शाह..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:36 AM2024-12-03T11:36:39+5:302024-12-03T11:37:01+5:30
अजित पवार हे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी पोहोचल्याची चर्चा होती
Maharashtra Politics: महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नांची उत्तरे ५ डिसेंबरला मिळणार आहेत. मात्र प्रचंड बहुमत मिळूनही सरकार स्थापनेसाठी इतका वेळ का लागत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्रिपदांच्या विभाजनावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी पोहोचल्याची चर्चा होती. मात्र आता सुनील तटकरे यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे.
सोमवारी रात्री अजित पवार हे दिल्लीत पोहोचले होते. अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अमित शाह चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट झालेली नाही. त्यामुळे अजित पवार हे दिल्लीत वेटिंग असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या वृत्ताचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खंडन करत अजित पवार अमित शाह यांच्या भेटीसाठी आले नसल्याचे म्हटलं आहे.
"येणाऱ्या काळात पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी मी, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी प्रदीर्घ चर्चा केली. अमित शाह यांची भेट झाली तर मंत्रिमंडळासंदर्भात आम्हाला चर्चा करता येईल. अजित पवारांनी अमित शाहांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती. त्यामुळे त्यामध्ये काही गैरसंवाद झालेला नाही. अजित पवार अमित शाह यांच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करुन आलेलच नाहीत. त्यावेळी अजित पवार दिल्लीत वेटिंगवर आहेत हे वृत्त खोटं आहे. या वृत्ताचे मी खंडन करतो. आम्हालाही माहिती होतं की अमित शाह आज चंदीगढ येथे जाणार आहेत," असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
आमदार कमी असले तरी सत्तेत वाटा समसमान असावा अशी तुमची भूमिका असणार आहे का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
"मंत्रीपदं वाटपाच्या चर्चेसाठी आम्ही बसू त्यावेळी किती खाती घ्यायची याची चर्चा करु. लोकसभेला आम्ही फार जागा मिळवू शकलो नाही. उलट धाराशिवची जागा आम्हाला नको असताना लढवावी लागली. परभणीची जागा लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली होती. परंतु महादेव जानकरांना महायुतीमध्ये घेतलं जावं असा निर्णय अमित शाह यांच्या समोर झाला होता. त्यावेळी ती जागा आम्हाला सोडावी लागली. विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह होता. जास्त जागा मिळाल्या असत्या तर अधिक आमदार निवडून आले असते. मात्र तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याने प्रचाराची रणनिती आम्हाला चांगल्या पद्धतीने राबवता आली आणि भव्यदिव्य यश मिळालं," असंही सुनील तटकरे म्हणाले.
"महायुतीमध्ये मान सर्वांनाच आहे. मान मिळाला नसल्याचे वक्तव्य कोणी केल ते मला माहिती नाही. ज्यावेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो त्यावेळी वरिष्ठांची भेट झाली तेव्हा सर्वांना सन्मानपूर्वकच वागवलं जात आहे," असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.