मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून मिर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सरकार स्थापनेबाबत होणारी ही बैठक शेवटची असणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना ते म्हणाले की, शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे. यात सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार आहे.त्यानंतर अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार हे घेतील. तसेच आज होणारी बैठक ही शेवटची बैठक असणार असल्याचे सुद्धा तटकरे म्हणाले.
विशेष म्हणजे याआधी सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र त्यांनतर सुद्धा निर्णय होत नव्हता. मंगळवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची सुद्धा बैठक झाली. त्यांनतर आता आज पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. तसेच या बैठकीचा अहवाल दोन्ही पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे देणार आहेत.
तर महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापनेवरुनचा गुंता पवारांनीच सोडवला म्हणता येईल. कारण, महाशिवआघाडीबाबतचं कोडं आता पवारांनीच उलगडलंय. 'शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल', असे शरद पवारांनी म्हटलंय.