Sunil Tatkare, PM Modi at Mumbai, Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांच्या निवडणुकांआधी मुंबईत सभा घेणार आहेत अशी माहिती आहे. १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले आहे. त्या सभेची तयारी करण्यासाठी एक बैठक घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. या आणि मुंबईतील इतर संभांबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले. चौथ्या टप्प्यापर्यंतचे मतदान महायुतीला अनुकूल झाले आहे. आता मोदींच्या मुंबईतील सभा यशस्वी करण्याची जबाबदारी आमची आहे, असे महत्त्वाचे विधान तटकरे यांनी केले. आज मुंबई प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधला.
"राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे," असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
"विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल. महायुतीची लाट आहे असे विरोधक म्हणणार नाहीत, ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले जात आहे. पण यापेक्षा ग्राऊंड रिअॅलिटी फार वेगळी आहे," असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.