NCP Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. निवडणूक निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. शरद पवारांच्या पक्षातील चार ते पाच आमदार काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असून ४ जूननंतर ते पक्ष सोडतील, असं तटकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हटलं होतं. मात्र तटकरेंच्या या वक्तव्याविषयी आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचं म्हटलं आहे.
सुनील तटकरे यांच्या दाव्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार म्हणाले की, "मी जरी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काय म्हटलं हे मला माहिती नसतं. आम्हालाही काही गोष्टी या माहीत नसतात, त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही."
सुनील तटकरेंचा नेमका दावा काय?
"राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँगेसमध्ये जायच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांपासून या आमदारांकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्षांतर्गत नाराजीतून हे आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत," असा दावा तटकरे यांनी केला होता.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पलटवार
सुनील तटकरे यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांनी सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "तटकरे साहेब ४ जून फार दूर नाही, थोडं थांबा. आमचा पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानी व प्रगतीशील विचारांच्या पायावर उभा आहे. ४ जूनच्या निकालानंतर कुठे प्रवेशाची रांग लागते हे तुम्हाला समजेलच," असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.