मुंबई, दि. 4 - बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीनं एका मुलीला दत्तक घेऊन आई होण्याची इच्छा पूर्ण केली आहे. आईच्या भूमिकेत आल्यापासून सनी फारच आनंदित आहे. आई होण्याचे प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवत असल्याचेही सनीनं सांगितले. काही दिवसांपूर्वी सनीनं दोन वर्षांच्या मुलीला लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतले. या गोंडस मुलीचं निशा कौर वेबर असे नाव आहे.
मात्र, निशाबद्दलची एक कदाचित कुणालाच माहिती नसावी. सनीनं निशाला दत्तक घेण्यापूर्वी जवळपास 11 अशा दाम्पत्यांना तिला नाकारले ज्यांना मुलं दत्तक घ्यायचे होते. मुलं दत्तक घेण्यासाठी कार्य करणारी संस्था CARA ( सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी )नं या वृत्ताला पुष्टी दिली आहे. मुलं दत्तक घेताना सर्वजण आरोग्य ते अन्य माहितीपर्यंत सर्व बाबतीत बराच विचार करतात आणि त्यानंतर मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतात.
CARA नं सांगितले की,''निशाचा रंग-रुप, तिची पार्श्वभूमी, आरोग्याची माहिती अन्य गोष्टींना अधिक महत्त्व न देता सनीनं तिला स्वखूशीनं दत्तक घेतले. या प्रक्रियेदरम्यान त्यांनी कोणत्याही प्रकारे नियम अथवा कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि सर्वसामान्यांप्रमाणे तिनंदेखील निशाचा ताबा मिळवण्यासाठी प्रतीक्षा केली''.
सनीनं 30 सप्टेंबर 2016 रोजी मुलं दत्तक घेण्यासाठी CARAकडे ऑनलाइन अर्ज केला होता आणि 21 जून 2017 या दिवशी सनी आणि निशाची भेट घडवण्यात आली. सनीनं दुस-या दिवशीच लगेचच निशाला दत्तक घेण्यासाठी होकार दर्शवला कारण मुलं दत्तक घेण्यासाठी केवळ 48 तासांचा कालावधी दिला जातो. ''मी निशाचा फोटो ज्यावेळी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा आनंद आणि भावूक झाले होते. पालकत्वासाठी नऊ महिन्यांची वाट पाहावी लागते. पण, आमच्या बाबतीत तीन आठवड्यांमध्ये हे सर्व काही निश्चित करण्यात आले’, अशी प्रतिक्रिया निशाला दत्तक घेतल्यानंतर सनीनं दिली होती.