- महेश चेमटे, मुंबई‘ताई, माई, आक्का...’, ‘एकच वादा...’, ‘कोण आला रे कोण आला’... अशा घोषणांनी मुंबापुरी दुमदुमत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज (रविवारी) सायंकाळी ५ वाजता प्रचार करण्याची मुदत संपुष्टात येईल. त्यामुळे प्रचार कालावधीतील शेवटचा रविवार ‘सुपर संडे’ करण्यासाठी सर्व उमेदवारांनी कंबर कसली आहे.सर्वांत श्रीमंत महानगरपालिकेत प्रवेश मिळवण्यासाठी वयाची २२ वर्षे पूर्ण करणाऱ्यापासून ते साठीपार केलेल्या उमेदवारांनी ही पालिकेच्या आखाड्यात शड्डू ठोकून ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. कार्यकर्ते कम मतदारांची मने सांभाळण्यासाठी ‘शराब ते कबाब’ अशा मेनूने रात्र जागवल्या आहेत. शिवाय फेटे, पक्षीय चिन्हांचे बिल्ले, उपरणे यांनी सजलेली मंडळी मतदारांच्या घरोघरी जात मतांचा जोगवा मागत आहेत.विविध पक्षांमधील प्रचार रथांवरील उमेदवार ‘जमिनी’वर येऊन ‘डोअर टू डोअर’ प्रचाराला प्राधान्य देत आहेत, तर शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने काही पक्षांनी ‘रॅली’ आयोजनांवर भर दिला आहे. एकंदरीत शेवटचा रविवार ‘सुपर संडे’ करण्यासाठी खलबते सुरू झाली आहे. प्रचाररूपी हत्ती निवडणूक प्रक्रियेतून पार झाला असून, आता केवळ शेपूट बाकी आहे. त्यामुळे प्रचार निर्विघ्न आणि निर्विवाद पार पडावा, यासाठी उमेदवार अधिक जागरूक असल्याचे दिसून येत आहे.यंदाच्या प्रचारात युवकांना कल्पकतेचे रंग चढल्याचे दिसून आले. पारंपरिक प्रचारासह पथनाट्य, मूकनाट्य, नृत्य (फ्लॅश मॉब) अशा मतदारांना खिळवून ठेवणाऱ्या प्रचार पद्धतींचा मोठ्या संख्येने वापर करण्यात येणार असल्याचे बड्या उमेदवाराने सांगितले. यामुळे सुपर संडेसाठी ५ ते ६ ठिकाणी सादरीकरण करण्याच्या सूचना उमेदवारांनी केल्याने कलाकारांची गोची झाली आहे.
प्रचाराचा आज ‘सुपर संडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 3:45 AM