- जितेंद्र कालेकरठाणे - राज्य शासनाला एकट्या ठाणे जिल्ह्यातून वर्षभरातून सुमारे १०० कोटींचा महसूल मिळवून देणा-या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षकपद गेल्या दीड महिन्यापासून रिक्तच आहे. याठिकाणी येण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाची नियुक्ती करतात, याकडेच राज्यभरातील या विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष लागले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक एन.एन. पाटील हे जानेवारी २०१८ मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर म्हणजे १ फेब्रुवारीपासून राज्यभरात ज्येष्ठ असलेल्या अधीक्षकाची ठाण्यात नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, कोणाचीही नियुक्ती न झाल्यामुळे पालघरचे अधीक्षक विठ्ठल लेंगरे यांच्याकडे पालघरसह ठाण्याचाही अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ए, बी, सी, डी, ई आणि एफ (ठाणे आणि नवी मुंबई) तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडीसह दोन भरारी पथके अशा १३ विभागांचा कारभार आहे. याठिकाणी १३ निरीक्षक आणि दोन उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. जिल्हाभरातील देशी, विदेशी मद्य तसेच ताडीवरील शुल्क आणि विक्री नूतनीकरणाच्या शुल्कापोटी वर्षभरातून १०० कोटींचा महसूल एकट्या ठाणे जिल्ह्यातून राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत ९५ कोटींचा महसूल ठाण्यातून जमा झाला आहे. मार्चअखेरपर्यंत यात आणखी १० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. वरील सर्व अधिकाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाण्याला स्वतंत्र तसेच कायमस्वरूपी अधीक्षकाची गरज असताना तो पदभार पालघरचे अधीक्षक लेंगरे यांच्याकडे अतिरिक्त सोपवण्यात आला आहे. एकाच वेळी पालघर आणि ठाण्याचा पदभार पाहताना लेंगरे यांची मात्र चांगलीच कसरत होते. त्याऐवजी राज्यभरात ज्येष्ठ असलेल्या एखाद्या अधीक्षकाची ठाण्यात स्वतंत्र पदभाराने नियुक्ती व्हावी, अशी जिल्ह्यातील अधिकाºयांची अपेक्षा आहे.स्पर्धेमुळे नियुक्ती लांबणीवर?मुंबईपासून जवळ असलेल्या पूर्वीपासूनच प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाण्याच्या जागेसाठी वरिष्ठ अधीक्षकांपासून नव्यानेच अधीक्षक म्हणून रुजू झालेल्यांनाही ठाण्याचे आकर्षण असते. त्यामुळे मुंबईपाठोपाठ उर्वरित महाराष्टÑातील या ठाणे जिल्ह्यात येण्यासाठी अनेक अधिकारी उत्सुक असतात. अधिका-यांमधील या स्पर्धेमुळेच या ठिकाणची नियुक्ती नेहमीच लांबलेली असते, असेही एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.यापूर्वीही जळगावकडे अतिरिक्त कारभार!तत्कालीन अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या बदलीनंतर २०१५ मध्येही जळगावचे अधीक्षक एन.एन. पाटील यांच्याकडे २ मार्च २०१५ ते ५ जून २०१५ या कालावधीत ठाण्याचा अतिरिक्त कारभार सोपवला होता. ६ जून २०१५ पासून त्यांना ठाण्यात नियमित करण्यात आले. ३१ जानेवारी २०१८ मध्ये ते निवृत्त झाल्यापासून मात्र पालघरच्या अधीक्षकांकडे पुन्हा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
ठाण्याचे अधीक्षकपद दीड महिन्यापासून रिक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 4:13 AM