खामगाव: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणारा गहू निकृष्ट असल्याच्या तक्रारी काही ठिकाणच्या होत्या. त्यामुळे वितरणास योग्य नसलेला असा गहू घेण्याचे पुरवठा विभागाने नाकारले आहे. येथील वखार महामंडळाच्या या गोदामात काल शुक्रवारी दुपारी २ वाजता गव्हाचा पंचनामा करण्यात आला. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारे धान्य भारतीय खाद्य निगम यांच्याकडून पुरविण्यात येते. मात्र काही दिवसांपासून निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याच्या लाभार्थींच्या तक्रारी होत्या. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील पुरवठा विभागातील व संबंधित अधिकार्यांना लाभार्थींचा रोष सहन करावा लागत होता. याची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी यांनी घेतली. प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना राशनकार्ड व स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे काल जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी यांचेसह खामगावचे तहसीलदार ए.एन.टेंभरे, नायब तहसीलदार एम.एन.उबरहंडे, वखार महामंडळाचे साठा अधीक्षक वाघ, भारतीय खाद्य निगमचे प्रबंधक गुणनियंत्रक डी.एम.चतारे, तांत्रिक सहा. बी.टी.निमजे आदींनी संयुक्तरित्या नोव्हेंबर २0१३ या महिन्यात पुरवठा झालेल्या गव्हाचे नमुने तपासले. यावेळी काही पोत्यांमधील गहू मातीमिश्रीत तसेच लाल रंगाचा आढळून आल्याने या गव्हाचा पंचनामा करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वितरणास योग्य नसलेला गहू पाठविण्यात येवू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी भांडारपाल डी.ई.चोपडे, मनोज व्यास, वाहतूक प्रतिनिधी जोशी, अलका देशपांडे आदी उपस्थित होते.
** चिखलीसह इतर अशा १0 ठिकाणाहून वाटपासाठी आलेला गहू वितरणास योग्य नसल्याने परत खामगाव येथील गोदामात आणण्यात आला होता. त्यामुळे यापोटी नाहक भाड्याचा खर्च झाला. त्यामुळे हा खर्च भारतीय खाद्य निगमने करावा तसेच यापुढे असा प्रकार घडल्यास त्याचेही भाडे द्यावे, असे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी भारतीय खाद्य निगमला दिले आहे.