लोहारा येथील परवानाधारक : कॉटन मार्केट चौकात दुकानासमोर लावला मेटॅडोअर
यवतमाळ : गरिबांच्या हक्काचे रेशनचे स्वस्त धान्य काळ्या बाजारात राजरोसपणे विकल्या जात आहे. याकडे पुरवठा विभागाचेही सोईस्कर डोळे झाक असते. त्यांना कारवाईसाठी तक्रारीची गरज भासते. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष जिल्हा दौऱ्यावर आले असताना पुरवठा विभागाला कर्तव्याची जाणीव झाली. कॉटन मार्केट परिसरात शनिवारी दुपारी लोहारा येथील रेशनच्या धान्याचा मेटॅडोअर पकडून कारवाई केली.
शासनाच्या गोदामातून परवानाधारक कंट्रोल डिलरकडे वितरणासाठी एमएच-३४एम-१९३२ क्रमांकाच्या मेटॅडोअरमध्ये धान्य भरण्यात आले. शासकीय गोदामातून हा मेटॅडोअर थेट लोहारा येथे जाणे अपेक्षित होते. गरीबाच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने कॉटन मार्केट चौकातील धान्य व्यापारी संजय सोदी याच्या दुकानासमोर उभा करण्यात आला. हा प्रकार काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आल्याननतर याची माहिती पुरवठा विभागाला देण्यात आली. तालुका पुरवठा अधिकारी चांदणी शिवरकर, पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे यांनी कॉटन मार्केट चौक गाठून हा शासकीय धान्याचा मेटॅडोअर ताब्यात घेतला. त्यामध्ये ५८ पोते गहू व ३९ पोते तांदूळ आढळून आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक चवथनकर, जमादार अजय डोळे, संतोष मसाळकर यांनी पुरवठा विभागाच्या पथकाला मदत केली. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
राज्य अन्न आयोगाचे पथक जिल्ह्यात
गरिबांसाठीचे धान्य खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचते काय, आयसीडीसी प्रकल्पांतर्गत बालकांसाठीचा पोषण आहार दिला जातो का याची पडताळणी करण्यासाठी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे जिल्हा दौऱ्यावर आले आहे. त्यांच्यासोबत उपसचिव व इतर दोन सदस्य आहेत. त्यांनी दुपारी बैठक घेऊन पोषण आहारासह रेशनच्या धान्य पुरवठ्याची माहिती जाणून घेतली. राज्य अन्न आयोगाचे पथक जिल्ह्यात असतानाच यवतमाळ शहरातील रेशनच्या काळ्या बाजाराचा प्रकार उघडकीस आला.