जेजुरी : पालिकेने वीज मंडळाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी न भरल्याने जेजुरी शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरण व मांडकी डोहावरील पाणीउपसा करण्याऱ्या योजनेचा वीजपुरवठा वीज मंडळाच्या वतीने खंडित करण्यात आला आहे.जेजुरी शहराला नाझरे धरण व मांडकी डोहातून पिण्याचे पाणीपुरवठा केले जाते. मांडकी योजनेची २००३ पासून साडेतीन कोटी रुपये थकबाकी, तर नाझरे धरणावरील योजनेची दीड कोटी रुपये थकबाकी दाखविण्यात आली आहे. २००३ मध्ये पुरंदरला तीव्र दुष्काळ होता. या वेळी नाझरे धरणावर अवलबून असणाऱ्या जेजुरीसह परिसरातील सुमारे अडतीस गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ही योजना अधिग्रहण केली होती. या दुष्काळात या योजनेचे वीजबिल सुमारे पन्नास लाखांच्या दरम्यान होते. हे बील जेजुरी नगरपालिकेच्या नावावर देण्यात आले. हे बील कोणीच न भरल्याने या थकबाकीवर व्याज वाढत गेले आज अखेर मांडकी डोह व नाझरे धरणावरील योजनेची थकबाकी सुमारे पाच कोटी रुपये एवढी आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दुष्काळामधील वीजबिल कोणी भरायचे याबाबत शासन पातळीवर बैठका अद्याप चालू आहेत. मात्र, जेजुरी पालिकेने २०१३ पासून चालू वीजबिल वेळेवर न भरल्याने मांडकी डोहावरील योजनेची १ कोटी ८३ लाख, तर नाझरे योजनेची ७२ लाख रुपये थकबाकी आहे. तसेच नाझरे धरणावर माळशिरस-पारगाव योजना असून, या योजनेची थकबाकी सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपये असून, या तीन योजनांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असल्याचे जेजुरी महावितरणचे सहायक अभियंता यांनी सांगितले. (वार्ताहर)> हे बील भरण्यासंदर्भात शासन पातळीवर अनेकदा बैठका झाल्या आहेत. २०१३ नंतरची थकबाकी पालिकेच्या वतीने भरण्यात येणार असून, आजच १४ लाख रुपये भरण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.- समीर भूमकर, मुख्याधिकारी, जेजुरी नगरपालिकामागील सत्ताधारी व मुख्याधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे २०१३ नंतर वीजबिल वेळच्या वेळी न भरल्याने थकबाकी वाढत गेली व वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज तोडल्यासंदर्भात वीजवितरणचे अधिकारी रॉय यांच्याशी आंम्ही चर्चा केली आहे.हा प्रश्न मार्गी लावू तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करू. - वीणा सोनवणे ,नगराध्यक्षा, जेजुरी नगरपालिका
नाझरे, मांडकी पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: March 04, 2017 1:02 AM