अतुल जयस्वाल
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २ - मनुष्य जन्मभर रुढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या फेºयात अडकलेला असतो. ईहलोकाची यात्रा संपवल्यानंतरही त्याची या फेºयातून मुक्तता होत नाही. देह ठेवल्यानंतरही तेरवी, दसवा यासारख्या पारंपरिक विधीच्या जोखडातून मानसाची मुक्ती नाही. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या परंपरा अजुनही सुरुच आहेत. पातुर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबियांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली आहे. वडीलांची तेरवी न करता त्यासाठी होणारा खर्च स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेऊन विठ्ठल देवकते यांनी एक नवा पायंडा पाडला आहे.
मळसूर हे पातुर तालुक्यातील आडळणाचे एक गाव. अतिशय दुर्गम भागात असलेले या गावातील लोक जुन्या विचारांचे. या गावात शिकून मोठे झालेले मनपाचे सहायक माहिती अधिकारी विठ्ठलराव देवकते यांचे वडील संपतराव देवकते यांचे ३१ आॅगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. अंत्यविधीनंतर देवकते कुटुंबिय एकत्र बसले. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तेरवी, दसवा हे विधी ठरलेलेच. देवकते कुटुंबातील प्रमुख या नात्याने विठ्ठलराव देवकते यांनी वडींलाची तेरवी न करता तो खर्च स्पर्धा परिक्षा केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय आप्त स्वकीयांना बोलून दाखविला. सर्व कुटुंबियांनी तो निर्णय मान्य केला. तेरवीसाठी साधारणपणे २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च गृहित धरून त्या पैशातून गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सोपीनाथ संस्थानचे अध्यक्ष दिलीप काळे यांनीही मंदिराच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. विठ्ठल देवकते हे युवाराष्ट्र या संघटनेशी जुळलेले आहेत. संघटनेचे धनंजय मिश्रा व इतर सदस्यांनी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
अविनाश नाकट यांच्याकडून मिळाली प्रेरणा
पातुर तालुक्यातीलच तांदळी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ता अविनाश नाकट यांच्या पत्नी रुपाली नाकट यांचा पाच ते सहा महिन्यांपूर्वी दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. युवा राष्ट्र संघटनेशी जुळलेले व सामाजिक भान असलेल्या अविनाश नाकट यांनी रुढी, परंपरांचे जोखड झूगारुन पत्नीच्या तेरवीच्या खर्चाला फाटा देऊन गावातील शाळा डिजीटल केली होती. नाकट यांच्या समाजोपयोगी कार्याची प्रेरणा घेऊन विठ्ठल देवकते यांनीही वडीलांच्या तेरवीच्या खर्चातून स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.