दशरथ खाडे,
वाडा- चंद्रकांता या गाजलेल्या मालिकेतील यक्कू... असं ओरडणारा तो क्रूरसिंग आठवतोय..? त्याची वेशभूषा ज्याच्याकडे पाहून साकारली होती तो कलावंत म्हणजे शंकर कोकाटे. दरोडेखोरांच्या भूमिका साकारताना जिवंतपणा आणणारा हा कलावंत काही वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. आता मात्र एकाकी राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला मदतीच्या आधाराची गरज आहे. त्यांची पत्नी मंजुळाबाई कोकाटे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले, की कुणाचाही आधार नसताना त्यांनी स्वत:चं आयुष्य घडवलं. नाट्य कला क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला. आजही प्रेक्षक त्यांच्या आठवणी सांगतात. पण, आता आर्थिक परिस्थिती मात्र बेताची होत चालली आहे. कुणाचाही तसा आधार उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या आठवणींनी उर भरून येतो. डोळ्यांत आसवं जमा होतात. आता त्यांच्याच आठवणीवर जगत आहे. या कुटुंबाची परिस्थिती सध्या बिकट असून त्यांचा मुलगाही जग सोडून गेल्याने मंजुळाबाई एकाकी विपन्नावस्थेत जगत आहेत. कलावंताच्या कुटुंबीयांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मंजुळाबाई कोकाटे यांनी केली आहे. अभिनेते शंकर कोकाटे यांनी अवघ्या दहाव्या वर्षी गाव सोडले आणि मुंबईला पळून गेले. एका पिरामध्येच राहून ते लहानाचे मोठे झाले. हळूहळू नाटकात काम करू लागले. मुंबई येथील लालबागच्या थिएटरमध्ये सुरंगी या नाटकाचा प्रयोग सुरू होता, त्या वेळी नामवंत तमाशामालक तुकाराम खेडकर यांनी त्या नाटकातील कोकाटे यांचे काम पाहिले आणि ते प्रभावित झाले. तिथून ते तमाशात आले व अभिनयाने त्यांनी लोकांना भुरळ घातली.>...अन् महिला पडली बेशुद्धत्यांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक सांगतात, की एका वगनाट्यात शंकर कोकाटे यांनी महाकालीचे पात्र केले होते. महाकालीला ओवाळण्यासाठी तमाशातील महिला कलावंत उभी होती. शंकर यांचे आगमन होताच त्यांचा आवाज, उग्ररूप पाहून ती महिला बेशुद्ध पडली.>कोकाटेंमुळेच साकारला क्रूरसिंगमास्टर शंकरराव कोकाटे हा एक वेगळाच कलावंत होता. सुरंगी नाटकात त्यांनी दरोडेखोराचे काम केले आहे. त्या नाटकाचे फोटो नारायणगावच्या राजकमल हॉटेलमध्ये लावलेले आहेत. या फोटोंतील कोकाटे यांची वेशभूषा पाहूनच चंद्रकांता या गाजलेल्या मालिकेतील क्रूरसिंगची भूमिका साकारली गेली... - रघुवीर तुळाशीलकर, नेपथ्यकार