पुणे : देशभरात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सरकारने पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे पवारांनी पाहिले सुद्धा नाही. त्यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पवारांना याची जाणीव नाही. असली तरी ते दुर्लक्ष करत आहेत.काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी देखील याबाबत कोणत्याही प्रकारे भूमिका घेतली नाही.त्यामुळे मराठा समाजाला संघर्ष करावा लागत आहे, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कुंजीर यांनी केली आहे.
पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील,नाना निवंगुने, हनुमंत मोटे, अनिल ताडगे, धनंजय जाधव, मीना जाधव, गणेश मापारी, जगजीवन काळे, जितेंद्र कोंढरे , महेश टिवे आदी उपस्थित होते.
समन्वयक कुंजीर म्हणाले, सरकारने डोळ्यावर आणि कानावर हात ठेवले आहेत. सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे. मराठा आरक्षण दिले की लगेच न्यायालयात याचिका दाखल केली जाते. मात्र कोणत्याही समाजाबद्दल आमच्या मनात द्वेष नाही. नियुक्त्या रखडलेल्या आहेत, म्हणुन, आझाद मैदानावर एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यात सरकारने सरकारी भरतीचा घाट घातला आहे. मराठा आरक्षणावर दि. ५ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर नजर ठेवणार आहोत. निकाल बाजूने लागला तर स्वागत करणार आहोत. जर विरोधात गेला तर सर्वानुमते पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चा काढणार मराठा संघर्ष यात्रा.... मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. दि. ५ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी दि.४ रोजी पुणे ते साष्ट पिंपळगाव अशी मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ४ रोजी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात होईल. दि. ५ रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.