मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अॅप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असून, शिक्षण विभागाच्या मार्गदर्शन केंद्रांचा विद्यार्थ्यांना आधार मिळत आहे.शालेय शिक्षण विभागाने मुंबई विभागाच्या एकूण ११ झोनमध्ये ४७ मार्गदर्शन केंद्रे उभारली आहेत. शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका नीटपणे वाचली नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मार्गदर्शन केंद्रांवरील मार्गदर्शकांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याची फोटोकॉपी अर्जासोबत जोडायची आहे. या मार्गदर्शन केंद्रांवर आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सोय करण्यात आल्याने मोलाची मदत झाल्याची प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.मुंबईतील विद्यार्थ्यांना स्थानिक शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मुंबईबाहेरील आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्रांची मोलाची मदत आहे. कर्नाटकहून आलेल्या साद कुरेशीला मुंबईतील हिंदुजा महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र फॉर्म भरताना त्याला अडचण येत होती. म्हणून त्याने सीएसटी येथील अंजुमन ए इस्लाम शाळेतील मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. तिथे त्याने वडिलांच्या नोकरीचे स्थलांतर झाल्याचा पर्याय निवडला होता. ती चूक मार्गदर्शकाने लक्षात आणून दिल्यानंतर त्याचा प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. त्यानंतर मार्गदर्शकांनी त्याला दुसऱ्या टप्प्यातील अर्ज कसा भरायचा, याबाबतही मार्गदर्शन केले. परिपूर्ण मार्गदर्शनानंतर सादच्या चेहऱ्यावरील टेन्शनचे रूपांतर आनंदात झाले होते. राज्याबाहेरील, बाहेरून दहावी उत्तीर्ण केलेल्यांना मदत-विद्यार्थी आणि पालक शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका पूर्ण वाचत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.-बाहेरून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने मार्गदर्शन केंद्रावर अवलंबून आहेत.-कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी मुंबई आणि राज्याबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रांची मोलाची मदत होत आहे.-मार्गदर्शन केंद्रावर मिळणाऱ्या तत्काळ मदतीमुळे कोणत्याही केंद्रावर लांबच लांब रांगा लागत नाहीत.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांचा आधार
By admin | Published: June 14, 2015 2:09 AM