मुंबई : महाराष्ट्र अखंड ठेवून विकास करण्याचे वचन देणाऱ्यांना पाठिंबा देण्यास आपण तयार आहोत. मात्र अजून याबाबत कुणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही. कुणी चर्चेला आले तर बघू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापनेला १० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे सूचक विधानही त्यांनी केले.उद्धव म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जनतेने साथ दिली आणि शिवसेनेला प्रतिसाद लाभला. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अजून आपल्याला कुठलाही निरोप आलेला नाही. शिवसेनेने भाजपाला काही अटी घातलेल्या नाहीत कारण अटी घालण्याकरिता चर्चेला अजून कुणी शिवसेनेला भेटलेले नाही. कदाचित भाजपा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय स्वीकारू शकतात, असेही ते म्हणाले.भाजपा व राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला टार्गेट करीत आहेत का, असे विचारले असता आपल्याला कुणी टार्गेट करू शकत नाही, असे उद्धव म्हणाले. सामान्य माणसाच्या आशीर्वादावर शिवसेनेला यश मिळाले. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना दु:ख दिले ते लोक लोकसभा निवडणुकीत हरले आणि आताही हरले याचा आपल्याला आनंद आहे, असे सांगत त्यांनी नाव न घेता नारायण राणे यांना टोला हाणला. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र अखंड ठेवणा-यांना पाठिंबा
By admin | Published: October 20, 2014 6:18 AM