ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.1 - अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी समर्थन केले आहे. तर शिवसेनेसह मनसेने मात्र सलमानच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने तर सलमानला वडील सलीम खान यांच्याकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्यावेत, असा सल्ला देत टीका केली आहे.
उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यावर 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' असे म्हणत त्याने पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली. सलमानच्या या वक्तव्याचे अबू आझमी यांनी समर्थन केले आहे.
आणखी बातम्या-
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी तळ उद्धवस्त केले, यावर आम्हाला गर्व आहे. मात्र, जे पाकिस्तानी नागरिक कामाच्या उद्देशाने किंवा उपचारांसाठी इथे वैध व्हिसासहीत देशात आहेत, त्यांचे स्वागत करणे आपले आपले कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली आहे.
जेव्हा आपण पाकिस्तानी नागरिकांना चांगली वागणूक देऊ, तेव्हा हेच पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांकडून आपल्यावर होणा-या हल्ल्यांचा निषेध करतील. जेव्हा पाकिस्तानी नागरिक भारताचे चांगल्या वागणुकीबाबत कौतुक करतील, तेव्हा ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानसाठीच लाजीरवाणी असेल, असेही अबू आझमी यांनी म्हटले आहे.