राज्यातील महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:10 PM2019-04-17T21:10:02+5:302019-04-17T21:13:18+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे.
पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा ठराव बुधवारी पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. लोकशाही विरोधी सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले.मराठा सेवा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, शहराध्यक्ष हर्षवर्धन मुगदूम, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सुधीर पुंडे, जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, प्राची दुधाने, डॉ सुनिता मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये अनेक पदाधिकाºयांनी भाषणे केली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडच्यावतीने पाठींबा देण्याचा ठराव मांडण्यात आला.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, उमेदवारी मिळाली नसली तरी लोकशाहीला घातक असलेले सरकार घालविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून करोडो लोक रस्त्यावर आले. याबरोबरच बहूजन, दलित मोर्च्याच्या माध्यमातूनही लाखो लोक रस्त्यावर आले. लोकांचा राज्यकर्त्यांवर विश्वास राहीलेला नाही. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्ही मांडतो. मात्र, पुरोगामी पक्षांकडून अशा चळवळीतील लोकांना पद मिळत नाही. आपल्या चळवळींचा ज्या पक्षांना फायदा होतो. त्यांच्याकडूनही चळवळीतल्या लोकांना अपेक्षित फायदा झालेला नाही. असे असले तरी देशातील लोकशाहीला घातक असलेल्या पक्षाला सरकारबाहेर काढण्यासाठी महाआघाडीला पाठिंबा देत आहोत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
-------------