- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यघटनेनुसार जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती झाल्यावर आपण प्रयत्न करू अशी ग्वाही, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मुंबईत दिली. ‘आपल्या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राचा भक्कम वाटा असेल’ असा विश्वास भाजपा आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी कोविंद यांना दिला. शिवसेना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेत्यांनी कोविंद यांना नि:संदिग्ध पाठिंबा दिला. खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र येण्याचे टाळले. गरवारे क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात भाजपा व युतीच्या आमदार, खासदारांची भेट घेत त्यांचे कोविंद यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच शिवसंग्रामचे विनायक मेटे व मंत्री उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कोविंद हे कर्तृत्ववान आणि व्यासंगी नेते आहेत. त्यांना ऐतिहासिक यश मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोविंद राज्यघटनेचे जाणकार आहेत. त्यांना महाराष्ट्रातून मोठे मताधिक्य मिळेल. खा.दानवे यांनीही शुभेच्छा दिल्या. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, कोविंद यांना विजयी करण्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानुसार शिवसेनेची सर्व मते कोविंद यांना मिळतील. रामदास आठवले यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.मातोश्रीवर गेलेच नाहीत रामनाथ कोविंद उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज मातोश्रीवर गेलेच नाहीत. त्यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. शिवसेनेने कोविंद याचा ‘समृद्धी’चा महामार्ग मोकळा करून दिला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.