भाजपला ताटकळत ठेवणाऱ्या शिवसेनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:58 AM2019-11-06T11:58:31+5:302019-11-06T11:58:42+5:30
एकूणच भाजपला तंगवणारी शिवसेना देखील काँग्रेसवर अवलंबून आहे. किंबहुना काँग्रेसने पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्यास, शिवसेनेची बार्गेनिंग पावर झटक्यात कमी होणार आहे.
मुंबई - सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला ताटकळत ठेवणाऱ्या शिवसेनेला अखेरच्या टप्प्यात विरोधी पक्षांची ताकद कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. मात्र काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. अशा स्थितीत शिवसेनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात अडकला आहे.
भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तर शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची साथ मिळणे आवश्यक आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे शिवसेनेची ऐन मोक्याची क्षणी कोंडी होते की काय, अशी स्थिती निर्माण आहे.
दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव अहमद पटेल यांनी दिल्लीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचा शिवसेनेला मिळणार असलेला संभाव्य पाठिंबा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी पक्ष जरी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असला तरी काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एकूणच भाजपला तंगवणारी शिवसेना देखील काँग्रेसवर अवलंबून आहे. किंबहुना काँग्रेसने पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्यास, शिवसेनेची बार्गेनिंग पावर झटक्यात कमी होणार आहे. त्याचा फटका शिवसेनेला सत्तेत समसमान मंत्रीपदं मिळविण्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या शिवसेनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.