समजा, उत्पन्न १०० रुपये, खर्च ९९ रुपये... तरी बरं चालतं आयुष्य; पण उत्पन्न ९९ रुपये आणि खर्च १०० रुपये असं झालं की घोळ झालाच!असं अनेकांचं होतं. मोठं होम लोन, त्याचा मोठा हप्ता. पगाराच्या ४५ टक्के तर दरमहा होम लोन जातं. एरव्ही लोक ते रेटूनही नेतात; पण फ्लोटिंग रेट जरा जरी बदलला तरी गडबड होते.
उंटाच्या पाठीवरच्या शेवटच्या काडीसारखा भार वाढतो, उंट बसायला लागतो. असं का होतं? अचानक खर्च वाढले, आजारपण आलं, पगारकपात, ले-ऑफ मिळाला की एकदम सगळा खर्चाचा डोलारा कोसळतो. म्हणून वेळेत विचार करावा- आपला पगार आणि खर्च, लाइफस्टाइल यांचा मेळ आज बसतो आहे, पण उद्या काही गडबड झाली तर? त्याची तजवीज आजच करायला पाहिजे. अंथरुन पाहूनच पाय पसरायला पाहिजेत. त्यापेक्षा आजचं आपलं पांघरुन भविष्यात आखूड होणार आहे हे गृहित धरायला हवं. त्यासाठी स्वत:ला विचारायचे हे काही प्रश्न -
१. समजा, या महिन्यात पगार नाहीच झाला तर.. कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही झाला, काम थांबवा तडकाफडकी असं म्हणाले तर? किंवा हातपाय मोडला, कावीळच झाला आणि बिनपगारी रजा घ्यायची वेळ आली तर? घराचे हप्ते थकतील का? मुलांचं शिक्षण थांबेल का? किराणा तरी घरात किती काळ भरू शकाल? सहा महिने निभावून नेऊ इतपत पैसा गाठीशी आहे का? या प्रश्नांची उत्तरं देताना जर भीती वाटत असेल तर तुम्हाला स्वत:च्या आर्थिक तब्येतीकडे तातडीने लक्ष द्यायला हवं.
२. इर्मजन्सी फंड आहे का? नसेल तर तातडीने तयार करा. सहा महिने जरी पगार झाला नाही तर आज जगतोय तितपत पैसा हाताशी राहील, अशी व्यवस्था तयार हवी. या इर्मजन्सी फंडाला हात लावायचा नाही.
३. क्रेडिट कार्डांची बिलं थकली आहेत का? क्रेडिट कार्डावर अनेकांचे संसार चालतात, जेमतेम ड्यू डेटला आवश्यक तेवढे पैसे भरून टाकतात, मग बाकी खरेदी सुरूच. कपडे, वीज आणि मोबाइल बिलं, किराणा हे सारं जर तसं भरत असाल तर तुमची आवक कमी, जावक जास्त आहे.
४. बचत किती, गुंतवणूक किती, खर्च किती? याचं उत्तर स्वत:लाच द्या. तातडीने खर्च कमी करून पहिल्या दोन गोष्टी वाढवा, स्टार्ट लिव्हिंग ऑन बजेट!- पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागार