नाशिक : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, शेतकऱ्यांविषयी सरकारच्या या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करताना आघाडी सरकार विरोधात शेतकरी हिताचा बनाव करणाऱ्या संघटना आज सत्तेत सहभागी असून, त्यांचे नेते गप्प का आहेत, असा सवालही उपस्थित करीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवरही निशाना साधला. नाशिक येथील वालझाडे मंगल कार्यालयात महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी शेतात पेटवून दिलेले कांदे उंचावून युती सरकारने शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटल्याचे सांगितले. डोंगरे यांच्या शेतातील जळालेले कांदे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत पोहोचविणार असून, उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी यातील काही जळालेले कांदे पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व निवडणुकांनंतर सत्ता स्थापन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेस हा प्रथम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान, रामदास कदम यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री पदाचा अवमाना केला असून, अशाप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा अवमान हा पुरोगामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
सरकारच्या दुर्लक्षामुळेच शेतकरी समस्याग्रस्त : सुप्रिया सुळे
By admin | Published: February 15, 2017 9:20 PM