मुंबई : सलमान खान चालकाच्या सीटवरून गाडीतून उतरला होता, असे मुस्लीम शेखने दंडाधिकारी न्यायालयासमोर २००६ मध्ये दिलेल्या साक्षीत म्हटले नव्हते़ त्यामुळे पोलिसांच्या दबावाने साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत असल्याचा आरोप सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला़ मात्र आपण दंडाधिकारी न्यायालयासमोरही अशीच साक्ष दिली होती़ पण त्याची नोंद का करून घेतली नाही, हे मला माहिती नसल्याचे शेखने न्यायालयाला सांगितले़ ही घटना घडली तेव्हा तेथे जमलेल्या गर्दीने सलमानला गाडीतून उतरण्यास सांगितले़ त्या वेळी त्याच्यासोबत त्याचा पोलीस सुरक्षारक्षक होता़ तोही गाडीतून बाहेर पडला व त्याने तेथे जमलेल्या नागरिकांना समजवल्याने सलमानला तेथून पळ काढता आला, असेही त्याने साक्षीत सांगितले़ पठाणने आपण सलमानला गाडीच्या पुढील बाजूच्या उजव्या दिशेच्या दरवाजाने बाहेर पडताना पाहिल्याचे न्यायालयाला सांगितले़ खानने मात्र सलमान नेमका कोणत्या दिशेने बाहेर पडला हे सांगणे कठीण असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले़ दरम्यान, भरपूर नुकसानभरपाईचे आमिष या तिन्ही साक्षीदारांना दाखवले असून, त्यामुळेच हे साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत आहेत, असा आरोपही अॅड़ शिवदे यांनी केला़ तो साक्षीदारांनी फेटाळून लावला़ यातील इतर तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष २१ मे रोजी नोंदवणार आहे़ ही घटना २००२ मध्ये घडली़ गेल्या वर्षी न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यास परवानगी दिली़ या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने हा खटला सत्र न्यायालयात वर्ग केला़ (प्रतिनिधी) साक्षीदाराला धमकी साक्षीदार मुस्लीम शेखला रविवारी निनावी फोन आला होता व त्याला या खटल्यात सलमानविरुद्ध साक्ष न देण्याची धमकी दिली होती़ या धमकीबाबत पोलिसांनी न्यायालयाला सांगितले़ त्याची दखल घेत या निनावी फोनची चौकशी करून त्याचा अहवाल १९ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले़
दबावाने साक्ष; सलमानच्या वकिलाचा आरोप
By admin | Published: May 07, 2014 3:17 AM