Shiv Sena Thackeray Group News: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर पक्ष नाव आणि चिन्ह यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांबाबत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना परत मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आहे. ते नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होणार आहेत. निवृत्तीआधी त्यांना त्यांच्यासमोरील प्रकरणे संपवायची असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह आणि पक्षनाव पुन्हा मिळण्याची संधी आहे. ठाकरेंचे युक्तीवाद स्ट्राँग आहेत. त्यामुळे त्यांना ते मिळू शकते, असा दावा सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची केस स्ट्राँग आहे
निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची केस स्ट्राँग आहे. शिवसेना पक्षासंदर्भात आता फक्त युक्तीवाद राहिला आहे. मार्च महिन्यात युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर एक-दोन तारखा दिल्या जातील. या तारखांना युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल, असे सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळू शकेल
एकंदरीत परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळू शकेल. लोकसभा निवडणुकीआधी हा निकाल येईलच असे नाही. पण विधानसभा निवडणुकांपूर्वी यासंदर्भातील येण्याची शक्यता आहे, असे मत शिंदे यांनी मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली नाही. पुढील आदेश येईपर्यंत उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव आणि मशाल पक्षचिन्ह वापरण्याचे निर्देश दिले. परंतु, आता त्याला एक वर्ष झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.