अजित पवारांसह बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 01:25 PM2019-09-02T13:25:23+5:302019-09-02T13:31:56+5:30
आरोपींनी तातडीने सुनावणीसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली.
मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते - पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ६ विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुणकुमार मिश्रा व न्या . एम. आर. शहा यांनी सोमवारी फेटाळल्या आहेत. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून दिलेला कारवाईचा आदेश योग्यच असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच, याप्रकरणी आरोपींनी तातडीने सुनावणीसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला (ईवोडब्ल्यू) दिले होते. त्यानुसार २५ हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते - पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या ७६ जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली. सक्तवसुली संचालनालयही (ईडी) या प्रकरणाची समांतर चौकशी करेल, अशीही माहिती मिळते.
(महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल)