मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा फैसला सुप्रीम कोर्टात लागणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तर निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास सत्ताधारी आमदार व्यक्त करत आहेत. राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून निकालामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आता पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे. निकालानंतर राजकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना गृहविभागाकडून देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. त्यावर निकालाची प्रतिक्षा सगळे करत होते. आज सुप्रीम कोर्टात हा निकाल लागणार आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
जयंत पाटील यांना ईडीची नोटीसएकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस दिली असून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता१४ फेब्रुवारी २०२३ पासून शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षावर याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहेत.