ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - दहीहंडीच्या उंचीवर फेरविचार करावा यासाठी जोगेश्वरीतील 'जय जवान' गोविंदा पथकाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे दहीहंडीची उंची २० फूटापर्यंतच राहील.
सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवडयात दहीहंडीची उंची २० फूटापेक्षा जास्त असू नये तसेच १८ वर्षाखालील गोविंदाच्या पथकातील सहभागावर बंदी घातली होती. जय जवान मंडळाने उंचीच्या मर्यादेची अट शिथिल करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवला.
जय जवान, माझगाव ताडवाडी आणि काही मोजकी गोविंदा पथके आठ थर अतिशय सहजतेने लावतात. जय जवान गोविंदा पथकाची नऊ थर रचण्याची क्षमता असून, त्यांनी अनेकदा हा विक्रम केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या गोविंदा पथकांना क्षमता असूनही मोठे थर रचता येणार नाहीत तसेच उत्सवाच्या मोठया आयोजकांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे आपल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार कारावा यासाठी जय जवानने याचिका दाखल केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच कोर्टाच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना गोविंदा पथकांना उंचीची मर्यादा न पाळण्याचे आव्हान केले आहे.