सुप्रिया सुळेंकडून स्वत:ची उमेदवारी जाहीर?; पोस्टची चर्चा होताच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 05:03 PM2024-03-01T17:03:19+5:302024-03-01T17:06:48+5:30
सुप्रिया सुळे यांनी काल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली.
Supriya Sule Baramati ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. कारण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली असून कुटुंबातील दोन व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने-सामने आल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुनेत्रा पवार यांचे जोरदार प्रयत्नही सुरू असून त्या लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी काल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली. या पोस्टमधून सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली उमेदवारी जाहीर केल्याचंच दिसत होतं. याबाबत चर्चा रंगताच सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितल्याने बारामतीतून मागील दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांना नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. याच चिन्हासह फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी मतदारांना आवाहन केलं होतं. यातून तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर केली आहे का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना खासदार सुळे यांनी म्हटलं की, "ही माझ्या उमेदवारीची घोषणा नसून मी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तिकीट मागण्यासाठी केलेली विनंती आहे," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटप कसं असू शकतं?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र २०-१८-१० असे ठरले आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी २ जागा सोडणार असल्याचे समजते. दिवसभर चाललेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते.