सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, "सगळी नौटंकी आहे "
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:29 PM2024-11-09T14:29:30+5:302024-11-09T14:52:36+5:30
आर आर पाटील यांच्याविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली होती.
Ajit Pawar on Supriya Sule : तासगाव येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० कोटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकणात खुल्या चौकशीसाठीच्या फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर सभेत केले. तसेच आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. या प्रकरणावरुन आर आर पाटील यांच्या कुटुंबासह शरद पवार गटाने अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. आता या प्रकरणात सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार यांनी तासगावच्या कवठे महांकाळ येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्याबाबत भाष्य केलं होतं. माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर आर आर पाटील यांनी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आर आर पाटील यांच्या कुटुंबियांची माफी मागितली होती. "मी आर आर पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली मी त्यांना सॉरीही म्हटलं. कारण मला खूप दुःख झालं. आर आर पाटील यांचं निधन ९ वर्षांपूर्वी झालं आहे. आज त्यांची आई, त्यांची पत्नी, मुलं हयात आहेत. त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल? हे वाटूनच मी त्यांना सॉरी म्हटलं," असं सुप्रिया सुळेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितले.
झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना आर आर पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुप्रिया सुळेंच्या माफीबद्दल बोलताना ही सगळी नौटंकी असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. यावरु, "अरे बापरे बापरे...फारच माफी मागावी लागली...ही तर सगळी नौटंकी आहे. कशाला याला काही महत्त्व देता," असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
"२०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतले आणि आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली फाईल दाखवली. एसीबीमार्फत माझी खुली चौकशी करण्याचे आदेश आर. आर. पाटील यांनी दिले होते. मला ही गोष्ट कळल्यानंतर दुःख वाटले. आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापल्याची भावना निर्माण झाली," असं अजित पवार यांनी म्हटलं.