मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (17 जानेवारी) सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचे मला वाटते. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच, सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही सल्ला देणार का? असा सवाल उपस्थित पत्रकारांनी केला. यावेळी माझ्याकडे कोणी सल्ला मागितल्याशिवाय मी कोणालाही सल्ला देत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
याचबरोबर, आमच्या सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. शेतकरी, नोकरी, अर्थव्यवस्था याकडे प्रामुख्याने पाहणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आधीचे सरकार दडपशाहीचे होते. मात्र आमचे तसे नाही. चंद्रकांत पाटील यांना आमच्या सरकारवर टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो त्यांना संविधानाने दिला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावरून सध्या राज्यात वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊतांनी उदयनराजे यांच्याबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
गेल्या बुधवारी ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात आयोजित 'लोकमत पत्रकारिता पुरस्कार' सोहळ्यात संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते.
आणखी बातम्या..
''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''
निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका गृहमंत्रालयाने पाठविली राष्ट्रपतींकडे
संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे