मुंबईः हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. पीडितेनं गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली असून, मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय नेत्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.ही अतिशय दुर्दैवी घटना आज सकाळी झालेली आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे. हा मृत्यू नसून खून झालेला आहे, असं मला आता वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या. कुठलीही व्यक्ती असल्यास त्याच्याविरोधात अशी घटना घडल्यास त्याला तातडीनं न्याय मिळेल, असा मेसेज राज्यात गेला पाहिजे. कायद्याचा धाक बसणं अतिशय गरजेचं आहे. तिच्या आईवडिलांच्या भावनांचा विचारही करू शकत नाही. ते कोणत्या भयानक परिस्थितीतून जात असतील. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आधार म्हणून त्यांच्यासोबत उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला.