मुंबई - जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादीला अजित पवारांना पक्षात ठेवायचं होतं परंतु त्यांनीच आमचं आयुष्य अस्त व्यक्त करत सोडून जाण्याचा निर्णय घेतला असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे पक्षात २ गट पडले. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला. पक्षातील या वादावर सुळे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कधीही पक्षात नेतृत्वाची मागणी केली नाही. ते हे मिळवण्यासाठी सर्वकाही करत होते. जर मागितलं असते तर सर्व दिले असते. पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती असं त्यांनी म्हटलं. अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यात सुप्रिया सुळेंना पक्षाचं नेतृत्व हवं होते असं बोललं गेले. त्यावर सुप्रिया सुळेंनी खंडन केले. मला पक्षाचं नेतृत्व अजित पवारांना देऊन आनंद झाला होता असं त्यांनी सांगितले. इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये सुप्रिया सुळेंची मुलाखत झाली त्यात त्यांनी अजितदादांच्या प्रश्नावर खुलासा केला.
तसेच खरं आणि खोटं कोण या प्रश्नावर बोलताना मला वाटत नाही याच्या उत्तरासाठी जास्त वाट पाहावी लागेल कारण हे संपूर्ण देशाला माहिती आहे खरे कोण आहे. शरद पवारांवर पक्षपाताचा आरोप होतो, त्यावर अजित पवार असो अन्य कुणी आम्ही यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. पक्षात उत्तराधिकारी कोण याची काहीच चर्चा नव्हती. परंतु ज्याप्रकारे अजित पवारांनी पक्ष सोडला ते चुकीचे होते. अजित पवारांकडे पर्याय होता, ते थांबू शकले असते असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
दरम्यान, सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणात असल्याने त्या स्थानिक राजकारणात नीट बसत नाहीत. राज्याच्या राजकारणात अजित पवार जास्त सरस आहेत असं लोकांकडून बोललं जातं. त्यावर हे तर येणारा काळ ठरवेल. मला वाटतं, जबाबदारी सर्वांवर येते आणि कोण योग्य न्याय देतं हे आपल्यावर निर्भर करते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.