NCP SP Group MP Supriya Sule News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्यसूत्रधार म्हटला जाणारा वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर परळीमध्ये बाजारपेठ बंद करण्यात आली. कराड समर्थक टॉवरवर चढले. त्याची पत्नी आणि आई यांनी मकोका मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु केले. परळीमध्ये जाळपोळ करण्यात आली. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत. असे असताना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उशिरा का होईना वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका लावला गेला आम्ही अभिनंदन करतो. पण पुढे काय? आम्हाला न्याय अपेक्षित आहे कारण एका मुलाचा खून झाला आहे. खंडणी वसुली होत असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच बीड आणि परळीमध्ये पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर किती बरे झाले असते. संतोष देशमुख यांची मुलगी दहावीत आहे, तिचे खेळण्याचे वय आहे पण दिवंगत वडिलांसाठी न्याय मागते आहे. हा आपला महाराष्ट्र आहे का? वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी बीडची ही घटना आहे. जे कुणीही यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.
देशमुख, भुजबळ, राऊतांना ईडी लावता, मग वाल्मीक कराडला का नाही?
वाल्मीक कराड यांच्या संपत्ती संदर्भात रोज विविध माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे कीती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. यापूर्वी आयकीव माहितीवर अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांवर ईडी लावली. मात्र वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाही? बीड आणि परभणीमध्ये जे काही झाले आहे, त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनाच या संबंधी प्रश्न विचारले जातील. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे होता. अनेक नेत्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन नेत्यांवर ऐकीव माहितीवर आरोप झाले आणि त्यांनी राजीनामे दिले आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे. त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील. परळी आणि बीडमध्ये मंगळवारी गुंडांना सोडण्यासाठी टायर जाळण्यात आले, लोक टॉवरवर चढले, दुकाने बंद करण्यात आली. हे महाराष्ट्रात काय चालले आहे, गृहमंत्री काय करत आहेत, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली.