बारामती - मी माझं चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहचवते, मला नवीन चिन्ह मिळालंय, ते मायबाप मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक माध्यमाचा वापर करतेय. लोकशाहीत माझे मतभेद आहेत. मनभेद कुणासोबतही नाही. कुठल्याही गावात आमचा मित्रपरिवार आहे. २४ तास लोकांमध्ये राहणारी आहे. माझी वैयक्तिक लढाई कुणाशी नाही. माझी लढाई ही वैचारिक आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी केले आहे.
बारामतीतील रोजगार मेळाव्याठिकाणी सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. महारोजगार मेळाव्यात नेमकं किती नोकऱ्या मिळणार याची मी माहिती घेतेय. नोकरी आणि कंत्राटी इंटर्नशिप आहे हे पाहावे लागेल. प्लेसमेंटमध्ये पर्मनंट जॉब मिळायला हवेत. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते पण मी आरोप करत नाही. आधी ४३ हजार नोकऱ्या दिल्या जाणार सांगितले, आज ३० हजार नोकऱ्या मिळतील असं बोललं जाते आणि आता तर अस्थायी स्वरुपाच्या नोकऱ्या आहेत अशी माहिती कळाली. शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. एवढा खर्च करण्याऐवजी सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे वीजेचे बिल माफ करायला हवे होते असं त्यांनी सांगितले.
तसेच १५ वर्ष ज्या लोकांनी मला मतदान केले, त्याची जाणीव मला आहे. हे माझ्यावरील संस्कार आहेत. ज्यांनी मदत केली नाही त्यांचेही आभार, कारण ही लोकशाही आहे. आधी लोकसभा होऊ द्या, विधानसभेचे नंतर पाहू. आजोबांसाठी एखादा नातू भूमिका घेत असेल तर गैर काय? आमच्या सर्वांवर शारदाबाई पवारांचे संस्कार आहेत. पवार कुटुंबाचे संस्कार त्याची मर्यादा माझ्याकडून कधीही ओलांडली जाणार नाही. विद्यार्थी १० वाजल्यापासून बसलेत, कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे. आता मी पाण्याची व्यवस्था करायला सांगितली आहे. मला भारत सरकारकडून आमंत्रण आलंय म्हणून मी कार्यक्रमात आले असं सुळेंनी म्हटलं.