पुणे : खासदार म्हणून सुप्रिया सुळे पूर्ण अपयशी ठरल्या आहेत. मागील वेळी बारामतीने हात दिला म्हणूनच त्या वाचल्या. आता तर त्यापेक्षाही कठीण स्थिती आहे. त्या लढवत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे, नाही तर मीच उमेदवार असलो असतो, अशी टीका करत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुळे यांना लक्ष्य केले.पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना शिवतारे म्हणाले, ‘एखाद्या सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी किंवा जिल्हा परिषद करत असते ती कामे सुळे यांनी मागील ५ वर्षांत केली. सायकली वाटप करणे हे खासदाराचे काम नाही. योजना कोणत्या आणल्या, मतदारसंघाचा विकास काय केला हे महत्त्वाचे असते. तसे त्यांनी काहीही केलेले नाही.सुजय विखे किंवा पार्थ पवार यांचे कर्तृत्व काय, असा प्रश्न करत शिवतारे म्हणाले, नेत्यांची मुले हीच त्यांची आजची ओळख आहे. किमान १० वर्षे तरी त्यांनी राजकारण, समाजकारणात काम करायला हवे. त्यानंतर त्यांचा विचार व्हावा.शरद पवार यांच्यावरही शिवतारे यांनी निशाणा साधला. वाऱ्याची दिशा कोणती आहे हे त्यांनी बरोबर ओळखले व नातवाचे नाव सांगून माढा मतदारसंघातून माघार घेतली. निवडून आलेला खासदार म्हणून त्यांनीही माढा मतदारसंघात काहीही केलेले नाही. तेथील जनतेची नाराजी ओळखूनच त्यांनी माघार घेतली, अशी टीका त्यांनी केली.
सुप्रिया सुळे डेंजर झोनमध्ये- विजय शिवतारे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:54 AM