मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच औरंगाबादेत आल्या होत्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर त्यांनी वैजापूर येथील चिंतन बैठकीला हजेरी लावली होती. वैजापूरला येताना सुप्रिया ताईंना रस्त्यावरचे खड्डे दिसले नाही का, असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांना प्रवासादरम्यान रस्त्यावरील खड्डे दिसले नाही का, असा सवाल करण्यात आला. भाजप सरकारच्या काळात उठसूठ रस्त्यावरच्या खडड्यांचा सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचा सेल्फी का नाही घेतला नाही. त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपली होती की, असा खोचक प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेने जनाधाराचा अवमान करून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी नसून महाराष्ट्र भकास आघाडी असल्याची टीका दांगोडे यांनी केली. त्यांनी कर्जमाफीवरून देखील ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वात आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.