नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत राज्यातील तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच दुष्काळी स्थितीवर देखील चर्चा झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या सुळे यांना राज्याच्या राजकारणाचे तर वेध लागले नाही, अशी चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव झाली याबाबत मोठी चर्चाही रंगली होती. पण सुप्रिया सुळे यांनी याबाबत खुलासा केला आहे. राहुल गांधींसोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. याबाबत वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.
दुसरीकडे राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. परंतु, राहुल पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे आधीच समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी वेगळी भूमिका बजावू शकतात. राहुल यांच्या साथीने सुप्रिया सुळे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊन आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.