Supriya Sule vs Eknath Shinde Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. या सरकारमधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही केला जाणार आहे. या दरम्यान, महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवरून बरीच चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून शिंदे-फडणवीस यांच्याकडे एक विशेष विनंती केली होती. मात्र त्यांनीच आज थेट सवाल विचारत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काल केली होती विनंती-
"संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता कृपया आपण ओला दुष्काळ जाहीर करावा," अशी अत्यंत कळकळीची विनंती सुप्रिया सुळे यांनी काल केली होती.
आज मात्र थेट विचारला सवाल-
"सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असं काय घडलं की तिन्ही प्रकल्प दुसर्या राज्यात जाण्याचं कारण काय हे सत्य नागरिक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे," असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. "मुंबईतील बेस्टच्या बसेसवर मराठी दिवाळीच्या शुभेच्छा बॅनर पाहिले. शुभेच्छा दिल्याने बेस्टला पैसे मिळत असतील तर आनंद आहे. दिवाळीच्या शुभेच्छा द्या ना... मराठीवर प्रेम असेल तर कृती करुन दाखवा. मराठी भाषेसाठी काही तरी वेगळं करा. स्वतःच्या जाहिरातबाजीमध्ये मराठीपणा नको आम्ही मराठी लोकं फार स्वाभिमानी आहोत", असेही सुप्रिया सुळे यांनी ठणकावले.
"आनंद शिधा दिवाळीला लोकांना वेळेत भेटला का.. काही ठिकाणी फोटो व्यवस्थित झाले नव्हते म्हणून वाटप झाले नाही. आता यामध्ये फोटो महत्त्वाचा की गरीब माणूस महत्त्वाचा ज्याच्यासाठी तुम्ही हे करत आहात. हा पब्लिसिटी स्टंट होता. दिवाळीच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला द्या ना... मायबाप जनतेमुळे आपण आहोत. हे जाहिरातीचे सरकार आहे हे दुर्दैवी आहे. पहिल्यांदा ईडी सरकारच्या विरोधात एक संवेदनशील नेता दिसला त्याचं नाव बच्चू कडू आहे. त्यांनी काल संवेदनशीलपणे ५० खोक्यांचा उल्लेख केला. बच्चू कडू यांनी आरोग्यासाठी, अपंगांसाठी चांगले काम केले आहे. ५० खोक्यांचे ऐकून त्रास होतोय हे सांगितले त्याचा आनंद झाला", असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.