ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूरमधून तिकीट नाकारल्यानंतर गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून नाईक यांना एबी फॉर्मही देण्यात आला. विशेष म्हणजे संदीप नाईक यांची उमेदवारी रद्द करुन त्यांचे वडिल गणेश नाईकांना भाजपाने उमेदवारी दिली. या उमेदवारी नाट्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलंय.
गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव स्वत: संदीप नाईक व उपस्थित नगरसेवकांनी या बैठकीत मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिल्याने ऐरोलीतून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढतील, हे निश्चित झाले. गणेश नाईकांना कुटुंबातील दोन तिकीटासाठीही किती संघर्ष करावा लागला, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. मात्र, त्यासोबतच वडिलांसाठी आपल्या आमदारकीचा त्याग करणाऱ्या संदीप नाईकांचं कौतुकही त्यांनी केलंय. विशेष म्हणजे, संदीप यांचं कौतुक करताना, सुजय विखे आणि विजयसिंह मोहिते पाटलांना नाव न घेता टोलाही लगावला. महाराष्ट्रात आज, सगळे वडिल भरडले गेलेत मुलांच्या अॅम्बिशन्समध्ये, असे म्हणत सुप्रिया यांनी विखे अन् मोहिते पाटील कुटुंबीयांना अनुल्लेखाने मारले.
गणेश नाईक आमच्या पक्षात होते, तेव्हा घरात बसून 30-30 तिकटाचं वाटप ते आमदारांना करायचे. आज, त्यांच्या घरातील दोन तिकीटांसाठी किती अडचण त्यांची झाली. मी त्यांच्या मुलाचंही कौतुक करते, कारण मुलाने वडिलांसाठी त्याग केलाय. खरच कौतुकास्पद गोष्ट आहे, आजकाल महाराष्ट्रात दिसत नाही. महाराष्ट्रात उलट झालयं, सगळे वडिल भरडले गेले मुलांच्या अॅम्बिशन्समध्ये. ही पहिलीच केस असेल, नाईक फॅमिलीच्या घरातली, ज्यामध्ये मुलाने वडिलांसाठी त्याग केला, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. तसेच, हेच गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांची किती आण-बाण आणि शान होती. आज, भाजपावाल्यांनी त्यांचं काय ठेवलंय? असे म्हणत नाईक यांना भाजपात मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही सुप्रिया यांनी भाष्य केले.