नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेते आपल्या वारसांसह पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा आणि शिवसेनेची वाट धरत आहेत. त्यातच काल अहमदनगर येथील श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी एका पत्रकाराने प्रश्न शरद पवारांना प्रश्न विचारला, या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पवारांनी पत्रकाराला प्रतिप्रश्न केले आणि त्याच्यावर भडकले. त्यामुळे शरद पवारांचे रौद्र रूप पाहून सर्वजण अवाक् झाले.
यावर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत पवार साहेबांना आम्ही देखील इतके चिडलेले कधी पाहिले नव्हते. परंतु एखाद्या प्रश्नाच उत्तर मला द्यायचं नाही, असे आधीच सांगितले असताना पाच वेळा तोच तोच प्रश्न विचारला गेला. तसेच, एखाद्या प्रश्नच उत्तर द्यायच नसेल तर तितका अधिकार त्यांना आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. नेरूळमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला आज सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करत असताना पवारांचे नातलग माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हेदेखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर काल पत्रकार परिषद सुरू असताना शरद पवार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पवारांनी पत्रकाराला प्रतिप्रश्न केला. पक्षाचे नेते पक्ष सोडून जात असताना आता नातेवाईकही पक्ष सोडतायेत या प्रश्नावर शरद पवार भडकले. नातेवाईकांचा आणि ह्याचा काय संबंध? असा प्रतिप्रश्न पवारांनी पत्रकाराला केला. तुम्ही नातेवाईकाचा का विषय काढता? हे चुकीचं बोलताय असं सांगत शरद पवार पत्रकार परिषदेतून उठले.
'वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या'नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी 'वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या' असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा रोख सध्या भाजपाच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील बडे नेते गणेश नाईक आणि त्यांच्या पुत्राकडे असल्याची चर्चा सुरु झाली.