Supriya Sule tweet: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध विषयांवरून चर्चा रंगताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीला बारामती मतदार संघातून कोण उभे राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना, आज सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधले. सुप्रिया सुळे यांनी एक आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली. इतकेच नव्हे तर त्या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभारही मानले. त्यामुळेच या ट्विटची चर्चा रंगली. हे ट्विट राजकीय स्वरुपाचे नसून, एका मागणीच्या पूर्ततेसंदर्भात आहे.
"ही अतिशय आनंदाची बातमी आपल्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून येत्या १ एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरु होता. यास यश आले असून, या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री मा अश्विनीजी वैष्णव यांचे मनापासून आभार", असे सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये नमूद केले.
"दौंड येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे गैरसोयीचे आहे हे वेळोवेळी रेल्वे प्रशासन आणि मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले होते. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित केला होता. दौंडहून पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे अखेर रेल्वे मंत्रालयास पटले. दौंड तालुक्यातील मधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकही बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यास प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले असून आता यापुढे अडीअडचणींसाठी सोलापूरला जाण्याची गरज भासणार नाही", याकडेही सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधले.