Supriya Sule vs Devendra Fadnavis, Salman Khan Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी त्या परिसरात सुरक्षेत वाढ केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
"अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत", असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. "सलमान खानच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भर रस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. 'अबकी बार, गोळीबार सरकार' या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे," असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गँगची दहशत सुरूच आहे. कोयता गँगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गँगची दहशत पुणे परिसरात कायम आहे. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे."
पोटातलं ओठावर आलं..
पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाचे रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे. भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं असून या सरकारला संविधान बदलायचं आहे त्यासाठी त्यांनी ४०० पार ची घोषणा दिली आहे."
शरद पवारांवरील टीकेवर..
"शरद पवार यांच्यावर टीका ६० वर्षे सुरू आहे आणि त्यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. दररोज शरद पवार यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेलं ६० वर्ष मार्केटमध्ये खणखणीत आहे. ही चांगली बाब आहे. त्यांना काहीही करून शरद पवार यांना संपवायचं आहे आणि हे त्यांचं कटकारस्थान आहे", अशी टीका भाजपावर सुळे यांनी केली.