"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:02 PM2024-11-16T13:02:39+5:302024-11-16T13:03:24+5:30
"खरे तर, कोणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे की माननीय मोदीजी आणि अमित शहा यांनीही १०० नाही २०० वर्षं जगावे..."
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातही प्रचार रंगात आला आहे. येथे काका अजित पवार विरुद्ध पतण्या युगेंद्र पवार, असे एकाच पवार कुटुंबातील दोन सदस्य समोरा-समोर आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती विधानसभेकडे लागले आहे. दरम्यान, "लोकसभेला काहीतरी गंमत केली, पण आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमतच होईल. काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल की, परत कुणी वाली राहणार नाही," असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामतीकरांना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रितिक्रिया देताना "कुणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही," असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
अजित पवार यांच्या 'वाली' या वक्तव्यावर टीव्ही९ मराठीसोबत बोलताना सुळे म्हणाल्य, "ते अजित पवार आहेत, सर्वांना त्यांच्या बोलण्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे 'राम कृष्ण हरी'. खरे तर, कोणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे की माननीय मोदीजी आणि अमित शहा यांनीही १०० नाही २०० वर्षं जगावे. म्हणून, ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असले, तरी माझी इच्छा आहे की त्यांच्या सर्व नेत्यांनी १००-२०० वर्ष जगावे. आम्ही सर्वांनी लढावे. पण ही भाषा माझ्या संस्कृतीत बसत नाही."
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, हे गेले दोन महिने आम्ही सातत्याने बोलतो आहोत. आमच्यात एकसूत्रता आहे आणि एकदा आम्ही एखादी विचारधारा किंवा निर्णय घेतला की, आम्ही त्याच ट्रॅकवर राहतो, हे तुम्ही आमच्या सर्व मुलाखतींमध्ये बघितले असेल. त्यामुळे, गेली दोन महिने आम्ही हेच सांगत आहोत," असेही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले होते अजित दादा? -
"लोकसभेला काहीतरी गंमत केली, पण ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही? काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही."
"साहेबांनी सांगितलं, दीड वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बघणार आहे, याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे?" असा सवालही अजित पवार यांनी यावेली बारामतीकरांना केला.