पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 08:10 AM2024-01-11T08:10:54+5:302024-01-11T08:13:25+5:30
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे.
NCP Supriya Sule ( Marathi News ) : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली निकाल जाहीर केला. "पक्षातील बहुमताच्या आधारावर शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची २०१८ची घटनाच ग्राह्य धरता येत नाही. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद अस्तित्वात नाही. घटनेनुसार अधिकार कार्यकारिणीला असून, पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना पटावरून हटवण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही," असा महत्त्वपूर्ण निकाल राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्यामुळे शिवसेनेवरील एकनाथ शिंदे यांचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या निकालावरून हल्लाबोल केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटलंय की, "मराठी मुलुखात सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून देशभरात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे हे दोघे साठीच्या दशकातील नेते. आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या गौरवास्पद कामगिरीचा. त्यांनी उभे केलेले कार्य मोडून काढण्यासाठी त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट-कारस्थानं सुरू आहेत," असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असताना सुळे यांनी आम्ही लढणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. "पवार-ठाकरेंचे निष्ठावंत सहकारी त्यांनी केलेल्या कार्याला धक्का लावू देणार नाहीत. मराठी स्वाभिमानाचा झेंडा आकाशात फडकत राहील. यासाठी प्रयत्नांची शर्थ करू व त्यांना अभिमान वाटेल असे कार्य आपण उभे करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी मुलुखात सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून देशभरात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे हे दोघे साठीच्या दशकातील नेते. आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या गौरवास्पद कामगिरीचा.
— Supriya Sule (@supriya_sule) January 10, 2024
त्यांनी उभे केलेले कार्य मोडून काढण्यासाठी त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट-कारस्थानं… pic.twitter.com/O37pqVMkII
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमधून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केल्याने सुळे यांच्या टीकेला या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.