Supriya Sule On Narendra Modi : मोदीजी, तुम्ही महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करता?; सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:51 PM2022-06-17T23:51:48+5:302022-06-17T23:56:26+5:30
सुप्रिया सुळे यांनी वाचून दाखवला पंतप्रधानांचा पूर्ण कार्यक्रम.
“मोदीजी महाराष्ट्रात आले. त्यांचं स्वागत आहे. अतिथी देवो भव असं म्हणणाऱ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार हे त्यांना घेण्यासाठी पुण्याच्या विमानतळावर गेले. त्यांचा मानसन्मानही केला. त्यांनी आपल्याला काय केलं?,” असा सवाल राष्ट्रीय काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांचा कार्यक्रम काय होता याची यादीही आपल्याकडे असल्याचं त्या म्हणाल्या.
“पावणे दोन वाजता दर्शन, २ वाजता मंदिराचं लोकार्पण, दर्शन अभंगगाथा, नंतर पब्लिक फंक्शन, २.०८ मिनिटांनी पंतप्रधान स्टेजवर येतील, २.०८-२.१२ त्यांचा सत्कार होईल, २.१२ ते २.१५ नितीन मोरेजी, २.१५-२.२० देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते, २.२०-२.२३ संत चोखामेळा गाथा, २.२३-३ वाजेपर्यंत पंतप्रधानांचं भाषण. यात अजित पवार यांचं नाव कुठेही दिसत नाही,” असं कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. बसण्याच्या सोयीतही गंमत होती. एक नंबरच्या सीटवर नरेंद्र मोदी, २ नंबरला प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार याचं नाव आणि ३ नंबरला देवेंद्र फडणवीस. १ नंबरच्याचं भाषण बसायची जागा बरोबर भाषणही बरोबर, दोन नंबरच्याला बसायची जागा बरोबर पण भाषण नाही आणि तीन नंबर बसायची जागा आणि भाषणही हे लिहिलेलं असल्याचंही त्या म्हणाल्या.
“आमचं भाषण आम्ही विनंती पाठवली, ती तुम्ही कट करून पाठवली आणि व्यासपीठावर म्हणता भाषण करा हा आपला अपमान नाही का? टीव्हीसमोर तुम्ही भाषण करा म्हणताय पण तुमचंच ऑफिस दादांचं भाषण कट करून पाठवलंय. हे भाऊ म्हणून बोलत नाही. ते महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते आपल्या पक्षाचे नेते आहेत, पण ते तीन नंबरला. पहिले ते महाराष्ट्राचे आहेत, नंतर पुणे जिल्ह्याचे आहेत आणि नंतर ते आपले आहेत. आपला हक्क त्यांच्या जबाबदारीमुळे तीन नंबरला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
… तर काही हरकत नव्हती
“जर देशाचे पंतप्रधान येथे येतात, जर फडणवीसांचं भाषण नाही म्हटलं असतं तर समजू शकलो असतो तुम्ही दोघांनाही नाही म्हटलं. पंतप्रधानांची वेळ कमी असेल मान्य आहे. जर फडणवीस भाषण करू शकतात, तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर भाषण केलंच पाहिजे, हा माझा मराठी अस्मितेचा विषय आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमत्र्यांना तुम्ही नाही म्हटलं. हा पक्षपात नाही झाला का? भाजपतील देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात, पण महाविकास आघाडीतील अजित पवार भाषण करू शकत नाही. पंतप्रधानांना मला विचारायचंय मी नाराज नाही, पण मला आश्चर्य वाटतंय. तुम्हाला महाराष्ट्राचा इतका का द्वेष आहे याचं आश्चर्य वाटतंय. आज महाराष्ट्राचा अपमान झाला आहे,” असंही त्या म्हणाल्या.