मंगळवारी देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार निशाणा साधला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना बोलू न देणं हे दुर्देवी असून तो महाराष्ट्राचा अपमान असल्याचंही म्हटलंय.
“मिनिट टू मिनिट कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाला अजित पवारांचं भाषण व्हावं यासाठी माहिती पाठवली होती. परंतु त्यांची विनंती मान्य झाली नाही. त्यांना बोलू न देणं हे दुर्देव आहे. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाषण करून देता पण आमच्या नेत्यांना करू देत नाही, ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जाणुनबुजुन अपमान करण्यात आला का?“अजित पवार यांना राज्यातील शेतकऱ्यांचे, कास्तकर्यांचे त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे देखील प्रश्न माहीत आहेत. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी कार्यक्रम होत असताना महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हा अपमान जाणुनबुजुन करण्यात आला का? हा महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रकार होता का? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत.