औरंगाबाद: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ऍलर्जी आहे. ते स्वत: नास्तिक आहेत. तेच मी सभेत सांगितलं. मात्र शरग पवारांना ते झोंबलं, लागलं. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पवारांवर तोफ डागली. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असं राज म्हणाले. ते औरंगाबादच्या सभेत बोलत होते.
माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे बरं नव्हे, असं शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय. शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तकं मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवं तितकंच आणि सोयीचं वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तकं वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
शरद पवार कधीच त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला शिवरायांचा उल्लेख करत नाहीत. ते नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, याबद्दल वादच नाही. पण त्याआधी तो शिवरायांचा आहे. कारण शिवराय हेच शाहू, फुले, आंबेडकरांसाठी प्रेरणा आहे, असं राज यांनी म्हटलं. आमच्या राज्यातील अनेकांच्या अंगात देवी येते, भूतं येतात. ज्यावेळी लोकांच्या अंगात शिवाजी नावाचं भूत येईल, त्यावेळी आम्ही सारं जग पादाक्रांत करून टाकू, हे आंबेडकरांचं वाक्य आपल्या आवडीचं असल्याचं राज यांनी सांगितलं.