"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 05:48 PM2024-03-05T17:48:15+5:302024-03-05T17:48:37+5:30
पवार कुटुंबातील फूट, महायुतीतील अंतर्गत कलह या विषयांवर मांडली रोखठोक मतं
Supriya Sule NCP: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित आहे. याच दरम्यान, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले जाईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो. असे असतानाच आज सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना, पवार कुटुंबातील फूट, खाजगी आयुष्यातील घटनांचे मुद्दे, नुकताच सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प आणि महायुतीतील अंतर्गत कलह यावर आपले रोखठोक मत मांडले.
'यापेक्षा गलिच्छ काय असू शकतं?'
देश आणि राज्य लोकशाहीकडून दडपशाहीकडे सध्या जात आहेत. कोणी कसे वागायचे हा ज्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे, त्यामुळे या लोकशाहीत चर्चा तर झालीच पाहिजे. वैचारिक प्रगल्भता ही वयानुसार तरी आलीच पाहिजे. पण राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरीमध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडणं होतात. यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी महायुतीतील अंतर्गत कलहावर मत मांडले.
पवार कुटुंबात फूट....
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही. मला, शरद पवारांना, रोहित पवारांना कुणाच्याही खाजगी आयुष्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. कारण आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे एकत्र करू शकत नाही. त्यामुळे आमच्या कौटुंबिक वेळेत ज्या काही गोष्टी होतात, त्या आम्ही सांगू शकत नाही," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. पण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असल्याने माझे काही लोकांशी राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. कारण मी लोकप्रतिनिधी आहे. विकासकामे किंवा इतर कामांसाठी चर्चा होतात," असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.