- अनंत जाधवसावंतवाडी - राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या सावंतवाडी मतदारसंघात येऊन टिकेचे बाण सोडल्यानंतर अवघ्या 24 तासात मंत्री केसरकर यांनी राष्ट्रवादी चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.खासदार सुळे यांनी शाळा बंद बार सुरू अशी टिका केली होती. हि टिका मंत्री केसरकर यांना जिव्हारी लागली असून त्यामुळेच ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.या भेटीचा फोटो पवार यांनी स्वता टिव्ट केल्याने सर्वानाच आर्शचयाचा धक्काच बसला आहे.
खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.या दौऱ्यात त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी थेट मंत्री केसरकर सांभाळत असलेल्या शालेय शिक्षण विभागांच्या कारभारावरच बोट ठेवले होते. महाराष्ट्रात शाळा बंद आणि बार सुरू अशी परिस्थीती असल्याचे सांगत केसरकर हळू बोलून लोकांना भुरळ घालतात अशी टिपण्णी करतानाच शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाही ते एकनाथ शिंदे चे काय होणार असे म्हणत सुळेनी केसरकर याच्यावर थेट हल्ला चढवला होता.
खासदार सुळे यांच्या टिके नंतर मंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत संतप्त प्रतिकिया दिली होती.व एक शाळा बंद केली असेल तर दाखवून द्या असे म्हणत मी लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते.तसेच ते पवार माझे राजकीय गुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता.त्यातच मुंबई येथील महिला मेळाव्यात मध्यंतरी शरद पवार यांनीही शिक्षण खात्यातील कामावर नाराजी व्यक्त केली होती.तसेच महिलांनी आंदोलन करावे अशी सुचना केली होती.
या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी शनिवारी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे.महत्वाचे म्हणजे या भेटीनंतर स्वता शरद पवार यांनी टिव्ट करत भेट सार्वजनिक केल्याने सर्वानाच आर्शचयाचा धक्काच बसला आहे.मात्र या भेटीत काय घडले हे मात्र अद्याप समोर आले नाही.