नागपूर : ‘संगीत सम्राट’ व ‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८चे विजेते ठरले आहेत.लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजली गायकवाड व ब्रजवासी ब्रदर्स यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत.या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवडसंंगीतकार आणि गायक शंकर महादेवन, संगीत दिग्दर्शक प्रीतम, सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास आणि टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर या मान्यवरांनी पाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.वहिदा रहमान, अंकित तिवारीला ऐकण्याची उत्सुकतायंदाच्या या पाचव्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांची मुलाखत आणि तरुणाईचा लाडका गायक अंकित तिवारी यांची संगीतमय श्रद्धांजली हे विशेष आकर्षण राहणार आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध चित्रपट व संगीत समीक्षक, लेखिका भावना सोमय्या अभिनेत्री वहिदा रहमान यांची३० मिनिटांची मुलाखत घेणार आहेत. अंकितचे गाणे व वहिदा रहमान यांचे अनुभव ऐकण्यासाठी नागपूरकर प्रचंड उत्सुक आहेत.अंजली गायकवाडझी युवा वाहिनीच्या संगीत सम्राट शोमध्ये आपल्या जादुई आवाजाने विजेतेपदावर मोहोर उमटवणारी नगरची कन्या अंजली गायकवाड हिने सा रे ग म प लिटील चॅम्प शोही जिंकला आहे. अंगद आणि मनिषा गायकवाड या दाम्पत्याच्या पोटी २८ फेबु्रवारी २००६ साली अंजलीचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अंजलीने संगीत साधना सुरू केली. वडील अंगद हेच तिचे प्रथम गुरू आहेत. अंजली पाच वर्षांची असतानाच तिने राज्यस्तरीय भक्तिगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तेव्हापासून सुरू झालेला तिच्या यशाचा प्रवास अविरत सुरूच आहे. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांनी तिचा आवाज ऐकून तिला अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटात गायची संधी दिली. महाराष्ट्राच्या या प्रसिद्ध बालगायिकेने आता सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.ब्रजवासी ब्रदर्सब्रजवासी ब्रदर्स आजोबांच्या संगीत परंपरेला आपल्या प्रतिभेने समृद्ध करीत आहेत. सा रे ग म प लिटील चॅम्प जिंकणाºया ब्रजवासी ब्रदर्स यांनाही त्यांचे वडील हुकूमचंद यांनीच संगीताचे प्राथमिक धडे दिले. त्यांनी आॅस्कर विजेत्या संगीतकार ए. आर. रहमान यांच्या समूहातही काम केले आहे. हेमंत ब्रजवासी याचे गाणे ऐकून तर आशा भोसले यांना अश्रू आवरणे कठीण झाले होेते. सुफी संगीताला आपल्या खास अंदाजात शास्त्रीय संगीतात गुुंफणे ही या भावंडांची विशेषता आहे. केवळ उत्तर प्रदेशच नाही, तर देश-विदेशात त्यांना ऐकले जात आहे. ब्रजवासी ब्रदर्स यांचे संगीत क्षेत्रातील हे योगदान बघून त्यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार जाहीर; अंजली गायकवाड, ब्रजवासी ब्रदर्स ठरले विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:35 PM